बदलू लागलेत आता ऋतू
- बदलू लागलेत आता ऋतू
उन्हंही वितळून
पार आतपर्यंत
येतायत…
सरकत सरकत
पसरतायत ती
खिडकी लगतच्या
टेबलावरच्या
डायरीच्या पानात…
वितळून जातय त्यात
शब्दांत पडलेलं अंतर,
संकोच,अहंकार
आणि धीट होतेय
लेखणी…
दिवसेंदिवस
तेजस्वी,धारधार,प्रखर
होत चालली आहे
डायरी…
आणि
कालच्या
थिजलेल्या शब्दांवर
चढतोय वर्ख
आजच्या
चमचमणाऱ्या
समजूतदार उन्हांचा…
खरंच बदलतायत ऋतू!
🌿पालवी
(पल्लवी पतंगे)