ते वेड मजला लागले…


 

ते वेड मजला लागले

मी पुस्तकवेडा माणूस आहे. कुठेही पुस्तकांचे प्रदर्शन दिसले की तिथे गेलो म्हणून समजा. आणि रिकाम्या हाताने कधी परत आलेलो नाही. किमान दोनतीन तरी पुस्तके तरी विकत घेतल्याशिवाय मी घरी परत येत नाही. कधी कधी घरी मी या विषयावरून बोलणी ऐकली आहेत. ( म्हणजे नेहमीच ऐकतो.कुठे बोलू नका. तुम्हाला म्हणून सांगतो.) पण मी ठरवून टाकले आहे की या विषयावर काहीही बोलायचे नाही. ऐकून घ्यायचे. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही अशी माझी स्थिती होते.

पुण्याला वर्षभरातून माझ्या तीनचार तरी चकरा होतात. प्रत्येक वेळी पुण्याहून येताना मी श्रीमंत झालेला असतो. आणि घरी परतताना खूप समाधान असते. हे समाधान असते मनाजोगत्या पुस्तक खरेदीचे. आतापर्यंत कमीत कमी दोनेक हजार तरी पुस्तके माझ्या संग्रही असतील. माझ्याकडे पुस्तक ठेवायला जागा अपुरी पडायला लागली तेव्हा खास पुस्तकांसाठी एक कपाट मी बनवून घेतले. तेही जेव्हा भरले तेव्हा आम्ही म्हणजे मी दुसरे कपाट बनवले. आणि आता तेही भरत आले आहे. ( हे सगळे करत असताना मी किती सोसले असेल हे सुज्ञ वाचकांना लक्षात आलेच असेल )

माझ्याकडे मला एक प्रश्न नेहमी विचारलो जातो. काय करायची एवढी पुस्तके ? कधी वाचणार आहात ? या प्रश्नावर माझे उत्तर असते. घरात आहेत ना ? मग वाचेन केव्हा तरी. कोणाकडे पैसा, सोनेनाणे यांनी कपाटे भरलेली असतील तर माझ्याकडे पुस्तकांनी भरलेली कपाटे आहेत. त्यामुळे चोरांची मला फारशी भीती नाही. एखाद्याला असलीच आवड वाचनाची तर खुशाल ने बाबा काही पुस्तके. निदान वाचशील तरी..! मागे काही दिवसांपूर्वी पु ल देशपांडे यांच्या घरात चोर शिरले होते म्हणे ! त्यांच्या हाती काय लागणार पुस्तकांशिवाय..? तुकोबांच्या शब्दात सांगायचे तर, ‘ आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..’ तसे आमच्याकडे पुस्तकांचे धन सापडणार ! माझ्या मुलांना तर मी सांगून टाकले आहे की ग्रंथरूपी संपत्ती मी तुमच्यासाठी मागे ठेवणार आहे.

Advertisement

माझे हे पुस्तकवेड लहानपणापासूनचे आहे. याचे श्रेय मला माझ्या वडिलांना द्यावे लागेल. ते नेहमी नवनवीन पुस्तके मला वाचायला आणून देत. आणि पुस्तकांची एकदा जी गोडी लागली ती कायमची. एक गंमत सांगतो. मागच्या महिन्यात मी काही घरगुती कार्यक्रमासाठी आमच्या व्याह्याकडे सोलापूरला गेलो होतो. संध्याकाळी कार्यक्रम होता. विशेषतः स्त्रियांचा कार्यक्रम असल्याने आणि कार्यक्रमाला वेळ असल्याने मी फिरायला म्हणून बाहेर गेलो. थोडे अंतर गेल्यावर तिथे एका हॉलमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचा फलक पहिला. आणि माझी पाऊले आपसूक तिकडे वळली. त्या दिवशी माझा फोन मी नेमका घरी विसरलो होतो. आणि ते पुस्तक प्रदर्शन पाहता पाहता आठ साडेआठ केव्हा वाजले मला कळले नाही. इकडे मी ज्यांच्याकडे उतरलो होतो ती मंडळी माझा शोध घेऊन हैराण झाली होती. मी नवीन असल्याने रस्ता तर चुकलो नाही किंवा आणखी काय झाले असावे अशा नाना तऱ्हेच्या शंकांनी सगळी मंडळी काळजीत पडली. दोनतीन जणांचे पथक निरनिराळ्या दिशेला शोधार्थ पाठवण्यात आले. आणि थोड्या वेळाने आमची स्वारी हातात नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचा गठ्ठा घेऊन हजर झाली. घरी आलो तर सगळेच माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. सुरुवातीला मला कळेना की काय झाले आहे. मग हळूहळू सगळा गोंधळ लक्षात आला. आमचे व्याही म्हणाले, “ दादांचे पुस्तकप्रेम ( खरे तर त्यांना पुस्तकवेड म्हणायचे असावे ) माझ्या लक्षातच आले नाही. नाहीतर मी त्यांना बरोबर शोधून आणले असते. “

असे हे माझे पुस्तकवेड. माझ्या सगळ्या पुस्तकांना मी माझ्या लाडक्या अपत्याप्रमाणे जपतो. आणि ती सगळी पुस्तके मला पटकन दिसतील अशा रीतीने माझ्या नजरेसमोर असावीत असा माझा प्रयत्न असतो. वेळ मिळाला की त्यातले एखादे पुस्तक काढून घ्यायचे आणि निवांत वाचायचे. प्रवासात तर माझ्या सोबतीला एखादे पुस्तक हटकून असतेच. पुस्तकांसारखा मित्र नाही. गुरु नाही. ते कधी काही मागत नाहीत. देतात मात्र भरपूर.ते सुखदुःखात माझी साथ करतात. माझे बोट धरून मला आपल्यासोबत फिरवून आणतात. संकटात धीर देतात. संयम शिकवतात. जीवनाचा आनंद कसा घ्यायचा ते शिकवतात.

प.बंगाल मध्ये रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, शरदचंद्र उपाध्याय या सारखे थोर लेखक होऊन गेले. त्यांनी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली आणि त्यांचा वाचकवर्ग भरपूर आहे. प्रत्येक बंगाली माणसाच्या घरात त्यांची पुस्तके आढळणारच. मी असे ऐकले आहे की बंगाली माणसे दर महिन्याला किराण्याची यादी देतात त्याबरोबर आपल्या मुलांना एकदोन चांगल्या पुस्तकांची पण यादी देतात आणि पुस्तके आणायला सांगतात. खरंच किती चांगली कल्पना आहे नाही ! मग घरात आणलेली ती पुस्तके मुले वाचतात किंवा आईवडील वाचतात आणि त्यातून वाचनसंस्कृती जोपासली जाते. पण आपली परिस्थिती नसेल आणि पुस्तके विकत घेणे आपल्याला परवडत नसेल तर ग्रंथालय किंवा लायब्ररी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यातून आपल्याला आपली वाचनाची आवड जोपासता येईल. तेव्हा आजच्या पुस्तकदिनाच्या निमित्ताने एवढेच ! ( एक सुखद योगायोग. आजचा जागतिक पुस्तक दिन हा माझा जन्मदिन सुद्धा आहे. )

@ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी 9403749932


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!