अंध तरुण घेणार हिमालयाची अनुभूती
अंध तरुण घेणार
हिमालय सफरीची अनुभूती
पुणे – येथील ममता अंध, अनाथ केंद्रातील २७ अंध विद्यार्थ्यांना यंदाच्या मे महिन्यात स्वरुपसेवा ही संस्था हिमालयाची सफर घडवून आणणार आहे.
पुण्यातील स्वरूपसेवा संस्थेच्या खाटपेवाडी, भुकुम येथील मधुरांगण प्रकल्पात समाजातील वंचित घटक असलेल्या अंध, अपंग, अनाथ, निराधार, वृध्द, मतीमंद, विकलांग लोकांना आनंदाचे काही क्षण देण्यासाठी दोन दिवसांच्या सहलीसाठी आमंत्रित केले जाते. मागील वर्षी पुण्यातील ममता अंध अनाथ केंद्र येथील काही मुले दोन दिवसांच्या सहलीसाठी मधुरांगण प्रकल्पात आली होती. त्या वेळी गिरिप्रेमी गिर्यारोहण संस्थेतील गिर्यारोहक त्यांच्या सोबत गप्पा मारण्यासाठी आले होते. त्यांनी त्या मुलांना त्यांचे हिमालयातील मोहिमांचे अनुभव सांगितले, जणू काही तासाभरात पूर्ण हिमालयच या मुलांसमोर उभा केला. हे सर्व ऐकून उत्सुक झालेल्या मुलांनी गिरिप्रेमी आणि स्वरुपसेवा संस्थेला एक विनंती केली की, “आम्हालाही हिमालयात घेऊन जाल का? तुम्ही जे अनुभवता ते आम्हालाही एकदा अनुभवता येईल का?”
या उपक्रमात हिमालयात जाण्यासाठी ममता अंध अनाथ केंद्र या संस्थेत राहणारी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातील गरीब घरातील २५ मुलांची निवड करण्यात आली आहेत. हिमालय सफरीमध्ये या मुलांना मनाली, हिमाचल प्रदेश येथे नेण्यात येणार आहे. मनाली येथे एक दिवसाचा *टिल्ला शारणी हा ट्रेक,* मनाली फिरणे, तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव, अटल बोगदा, सिस्सू किंवा सोलांग नाला येथे बर्फाचा अनुभव, मनाली येथील प्रसिद्ध मोमोज आणि सिददूचा आस्वाद या सारख्या अनेक गोष्टींचा अनुभव ही मुले घेणार आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या २५ पैकी कित्येक मुले ही प्रथमच रेल्वेचाही अनुभव घेणार आहेत.
हिमालयातील थंड वातावरण, बर्फाच्या थंडगार स्पर्शाची अनुभूती आणि बर्फातील ट्रेक व कॅम्पिंग, रेल्वे प्रवास अशा सगळ्या वेगळ्या गोष्टींचा अनुभव अंध मुलांना मिळावा, यासाठी या सफरीचे आयोजन केले आहे. २७ अंध विद्यार्थ्यांबरोबर ३ केअरटेकर आणि ममता अंध, अपंग केंद्र, स्वरुपसेवा संस्था गिरीप्रेमी संस्था, लव्ह केअर शेअर फाउंडेशन पुण्यातील या सामाजिक संस्थांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून १५ जण असे एकूण ४५ जण असतील. १७ तारखेला पुणे रेल्वे स्थानकावरून ९ वाजता हा चमू हिमालयातील मनाली, अटल टनेल येथे जाण्यासाठी निघेल आणि २३ तारखेला पुण्यात परत येईल. या मुलांचा खर्च प्रत्येकी अंदाजे १५हजार रुपये येणार असून, तो देणगीदार आणि सहभागी संस्थांच्यावतीने केला जाणार आहे. समाजातील अन्य देणगीदार व्यक्तींनीही शक्य तितका आर्थिक हातभार लावावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
आर्थिक मदतीसाठी संपर्क
श्री.उमेश झिरपे, १२३२, आपटे रस्ता, पुणे ४.
मोबाईल ९८५०० ९३३०२ आणि ९८२२२ ४६९६२
Email:[email protected]
Website: https://swaroopseva.org/
A/c Name: Swaroopseva
Bank name: IDBI
A/C NO: 50210010010007
IFSC : IBKL0000502
Branch : Apte Road, Pune.