भावनेला आव्हान करणारे नृत्य म्हणजे अभिजात नृत्य
- भावनेला आव्हान करणारे नृत्य म्हणजे अभिजात नृत्य:
सुचेता भिडे – चापेकर
वाई : माध्यमापलीकडच्या अनुभूतीची जाणीव करून देणारे, चिरकालीन आनंदाची निर्मिती करणारे ,बुद्धीच्या परवानगीने भावनेला आव्हान करणारे नृत्य म्हणजे अभिजात नृत्य अशी अभिजात नृत्याची व्याख्या आपल्या व्याख्याना द्वारे सुचेता भिडे चापेकर यांनी केली. लोकमान्य टिळक संस्था संचालित वसंत व्याख्यानमालेच्या पाचव्या पुष्पात ‘शास्त्रीय नृत्य एक अमूल्य भारतीय वारसा’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी सौ. सुलभा प्रभुणे यांनी अध्यक्ष पद भूषविले.
सुचेता चापेकर पुढे म्हणाल्या, “नृत्य ही एक प्रयोगशील कला आहे. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, बॉलीवूडचे नृत्य असे नृत्याचे अनेक प्रकार आहेत. मात्र शास्त्रीय नृत्य हे खऱ्या अर्थाने अभिजात नृत्य आहे. ज्याप्रमाणे स्वर हे संगीताचे माध्यम आहे त्याचप्रमाणे भावना हे नृत्याचे माध्यम आहे. भारतात नृत्याच्या सर्वाधिक शैली आहेत.”
भरतनाट्यम, कथक ,ओडिसी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, कुचीपुडी, आसामी अशा अनेक नृत्यशैलींचे विस्तृत वर्णन सुचेता चापेकर यांनी केले. महाराष्ट्राला शास्त्रीय नृत्याची परंपरा नसल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. याचबरोबर महाराष्ट्रात त्यांनी स्वतः विकसित केलेली नृत्यगंगा ही शास्त्रीय नृत्यशैली त्यांनी स्पष्ट करून सांगितली. या व्याख्यानादरम्यान स्वराली मुळे व ऋचा खरे या त्यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम मधील हस्तमुद्रा, प्रथम मंडल-आयात, ईश्वराचे कौतुक करणारे नृत्य इत्यादी सादर केले. सुचेता चाफेकर यांनी स्वतः श्रीरामाच्या जीवनातील नवरसांचे दर्शन घडवणारे शास्त्रीय नृत्य सादर केले. सर्व श्रोतेजनांना यामुळे एका अत्यंत संपन्न नृत्याविष्काराचे दर्शन घडले.
सौ सुलभा प्रभुणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. श्री. श्रीनिवास खरे यांनी प्रास्ताविक केले. सौ.सुधा जाधव यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सौ जयश्री देशमुख यांनी आभार मानले. या व्याख्यानाचे प्रायोजक डॉ. अंजली पतंगे व श्री. गोविंद कुलकर्णी यांच्यातर्फे करण्यात आले होते. वाईकर व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—– स्वराली मुळे व ऋचा खरे नृत्य सादर करताना शेजारी सुचेता भिडे चापेकर.