कवितेने माझा हात कधीच सोडला नाही : संदीप खरे
आयुष्यात अनेक सुख दु:ख येत राहतात मात्र कवितेने माझा हात कधीच सोडला नाही — संदीप खरे
वाई ता. १७ : आयुष्यात अनेक सुखदुःख येत राहतात मात्र कवितेने माझा हात कधीच सोडला नाही. दैवाने माझ्या कवितेला एवढा सन्मान मिळाला. मात्र हे सारे घडले नसते तरी देखील मी कविता लिहिणे कधीच सोडले नसते. मी कायमच कविता माझ्यासाठी लिहितो. असे वक्तव्य प्रतीथयश प्राप्त, लोकप्रिय कवी संदीप खरे यांनी आपल्या मुलाखती द्वारे प्रकट केले. लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या पंधराव्या पुष्पात ‘मी आणि माझी कविता’ या विषयावर ते मुलाखत देत होते. यावेळी दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ विद्या पोळ यांनी मुलाखतकाराची जबाबदारी पार पाडली.
संदीप खरे म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रात काम करताना वाचन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाचकाचे डोळे नेहमीच वेगळे दिसतात. वाचन करताना माझ्या लक्षात आलं की प्रत्येकाची लिखाणाची शैली वेगळी असते. शैली म्हणजे त्या लेखकाच्या नजरेतून भाषेकडे बघणं. कविता लिहिताना आपल्या मनातील आशय कागदावर उतरवण्याची घाई असते. यामध्ये शब्दांना घड्या पडतात, शब्द मुरगळतात आणि वेगळेच शब्द तयार होतात. ‘मी मोर्चा नेला नाही’ या कवितेमध्ये बंड न करणाऱ्या वर्गाची मनस्थिती दाखवायची आहे. इथे अलंकारिक शब्द वापरून माझी भाषिक बुद्धिमत्ता दाखवायची नाही. कविता लिहिताना माझी नाही तर कवितेची गरज बघितली जाते.
काही वेळा अगदी कवितेच्या पहिल्या ओळीतच सारा अर्थ सामावतो. मग पुढच्या ओळी ह्या फक्त त्या ओळीच्या रंगछटा दाखवतात.कविता ही एका क्षणात, एका प्रसंगातून सुचत नाही. कविता ही अनेक प्रसंगांचं,दिवसांचं,कधीकधी संपूर्ण आयुष्याचे संचित असते. ‘कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते’ प्रमाणेच कुण्या काळाची कविता अचानक स्फुरते आणि ती कागदावर उतरते. अनेक वेळा मला कवितेची व्याख्या विचारली जाते. पण व्याख्येत मावेल ती कविता कसली! ताक घुसळताना अचानक जस लोणी हातात येत तसंच कविता ही अचानकच कधीतरी हातात येते. कविता सुचण हे कवीच्या नाही फक्त कवितेच्याच हातात असतं. कविता ही कवीला लेकी सारखी असते ती चांगल्या स्थळी पडली तरच समाधान वाटतं. काही ठराविक कार्यक्रमांमध्येच काही कविता म्हणाव्याशा वाटतात.
वृत्तबद्ध कविता हे कवितेचे सौंदर्य आहे. मुक्तछंदातल्या कविता या एखाद्या प्रतिभाषाली कवीला जेव्हा वृत्तात आपल्या आशय मांडता येत नाही तेव्हा निर्माण होतात. मात्र आजकाल काहीही लिहून कोणीही त्याला मुक्तछंदातली कविता म्हणत. वृत्तबद्ध लिहिणे म्हणजे ठाकठोक करून शब्द बसवणं नव्हे तर सौंदर्य निर्माण करणे.’
‘आयुष्यावर बोलू काही’ या शीर्षकाचे आत्मचरित्रपर पुस्तक काही काळातच रसिकांना द्यायची इच्छा असल्याचे संदीप खरे यांनी सांगितले.
एकदा माझी बायको म्हटली, वेड लागलं, स्पायडरमॅन ची बायको म्हटली ,पण, सांग सख्या रे ,मी अनेक चिंतांनी हे डोके खाजवतो, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, कवितेचा कोपरा अशा अनेक कवितांचं वाचन करून संदीप खरे यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. मुलाखतीचा शेवटही ‘आजी’ या आपल्या अत्यंत भावविवश करणाऱ्या कवितेने केला.
आदित्य चौंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयघोष कद्दू यांचे स्मृत्यर्थ श्रीमती संजीवनी कद्दू व बिलिमोरीया ,हायस्कूल पाचगणी यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजन केले . संदीप खरे यांच्या चाहत्यांनी कार्यक्रमास प्रचंड संख्येने उपस्थिती लावली.