तनमनकी सुदबुध गवाय बैठी..


के मैं तनमनकी सुदबुध गवाय बैठी..

मधुसूदन पतकी

Advertisement

साहेब बीवी और गुलाम. गुरुदत्तचा आणखीन एक अप्रतिम चित्रपट. खरंतर ब्रिटिश काळातली कथा. जमीनदार आणि सरंजामदार यांची राहणी. जीवनपद्धती. त्यावेळच्या महिलांची अगदी पत्नीची होणारी मानसिक होरपळ. समाज, त्यांचे रीतिरिवाज. अशा अनेक टप्प्यांतून हा चित्रपट प्रवास करतो. कथा, पटकथा, संगीत, गाणी सगळंच अफलातून. या चित्रपटातल्या कोणत्या गाण्याबद्दल लिहावं आणि किती लिहावं…! एकसे एक गाणी. मीनाकुमारी, गुरुदत्त, वहिदा आणि रहमान यांनी अभिनयाने हा चित्रपट ज्या उंचीवर नेला ती उंची एक नवं कीर्तिमान स्थापन करत असतं.
गीता दत्त. हिचा उल्लेख केल्याशिवाय हा लेखनप्रपंच पूर्ण होऊ शकत नाही. तिचा वेगळा पोत असलेला आवाज. गाण्याला ऐकवत असताना पाहायला लावणं आणि त्यासाठी त्या गाण्यात ओतप्रोत भाव ओतणं अफाट. तसं लता, आशा या त्यावेळच्या गायिकांनी गाण्याला नेहमीच न्याय दिला. आशय आणि अर्थाच्या पलीकडे जाण्याचा रसिकांचा मार्ग नेहमीच सुकर केला. ती गाणी जेवढी गीतकारांची होती तेवढीच त्यांनी आपल्या आवाजाने आपली केली. आपल्या हृदयात स्थापित केली.
अनेक गाणी जीवनाचा अर्थ, ऊर्जा, प्रवाहीपणा झाली. पिया ऐसो जियामे समा गयो रे… नितांतसुंदर गाणं. पिया अर्थात प्रियकर म्हणजेच पतीबरोबरची एकरूपता या गाण्यातून हळुवारपणाने उलगडत जाते. तो इतका तन,मनात सामावले की तिची तन,मनाची शुद्ध हरपली आहे.ती तिची राहिलीच नाही.
गाण्याच्या चित्रीकरणातून हे सगळे भाव एकजिनसी होत जातात. या गाण्यामुळे आणखीन एका गाण्याची आठवण होते. जरासी आहट होती है… आहट. म्हणजे चाहूल. चाहूल हा विषयच जीवाच्या जवळचा. विशेषतः प्रिय व्यक्तीच्या आगमनाची वेळ जसजशी जवळ येते तशी ही चाहूल, आहट अस्वस्थ करते. या गाण्यात असंच… खरंतर तो तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग. येणारी वार्‍याची झुळूक म्हणजे तो आला असं वाटतं आणि मग लाजून ती आपला चेेहरा घुंगटमध्ये लपवते.खरं तर ती त्याच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.त्याला प्रथमदर्शनी आपल्या नजरेत बांधून ठेवायचंय तिला.केशरचना ते पैंजणा पर्यंत ती शृंगारते आहे.त्याच्यासाठी. किती नाजूक, गोड नातं. आवाजाने ओळखावं आणि जवळ आल्यावर डोळे मिटून त्याला अनुभवावं. पूर्वेकडून येणारी वार्‍याची झुळूक अंगाला स्पर्श करते अन् ती लाजून फुलांनी सजवलेल्या पलंगावर जाते. सौभाग्यलेणं कुंकू ती केसांच्याच्या भांगेत खिरते. त्याला सुंदर वाटावी म्हणून पण तिच्या सौंदर्याला कोणाची नजर लागू नये म्हणून ती पटकन डोळ्यात काजळ घालते. त्याची चाहूल काय काय करायला लावते हे नर्म श्रृंगाराच्या वळणानी,हळुवार सांगते.
या गाण्याचे चित्रीकरण पण अगदी अलवार. त्याकाळातली सरंजामदारी किंवा जमीनदारी रुबाब आपल्याला दिसतो.त्याला झळाळी देते मीनाकुमारी. गुरुदत्त आणि अबरार अल्वी यांचे दिग्दर्शन. अल्वीला बेस्ट डायरेक्टरचा फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला. तसंच गुरूचा आवडता सिनेमॅटोग्राफर व्ही.के. मूर्तीना सॅल्यूट…!
इथंही ज्ञानेश्वर माऊलींच्या विराण्याची आठवण येते. शकील बदायुनीचे मोरपिशी शब्द, मीनाकुमारीचा मखमली अभिनय, हेमंतदांचं बंगाली, रवींद्र संगीत आणि आपण आपले केवळ वारंवार श्रवणातुर होणारे रसिक.नाही का.?
.
गाण्याची लिंक
https://youtu.be/tUn8NNFKXQs


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!