सुशील कुलकर्णी यांना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार जाहीर


पत्रकार सुशील कुलकर्णी यांना

‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार जाहीर

पुणे – ‘आम्ही सारे ब्राह्मण’ व ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ या नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा “ब्राह्मण भूषण” पुरस्कार पत्रकार व अ‍ॅनलायझर न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी यांना देण्यात येणार असल्याचे नियतकालिकांचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी व संचालक संजय ओर्पे यांनी आज येथे जाहीर केले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज (श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष) राहणार आहेत तर प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ उद्योजिका मंजूषा भावे उपस्थित राहणार आहेत. मुक्त पत्रकरितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ‘अ‍ॅनलायझर न्यूज’ या वृत्तवाहिनीचे संपादक, हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आणि नि:स्पृह पत्रकारिता या निकषांवर हा पुरस्कार सुशील कुलकर्णी यांना जाहीर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Advertisement

येत्या शनिवारी (25 मे) सायं. 5.30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वेरोड, पुणे येथे होणार्‍या या समारंभात ब्राह्मण भूषण पुरस्काराबरोबरच ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार माईंड अ‍ॅन्ड बॅाडी योग इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका मनाली देव यांना, ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती युवा कीर्तनकार’ पुरस्कार ह. भ. प. संज्योत केतकर यांना आणि ‘भगवान परशुराम ब्राह्मण संस्था’ पुरस्कार महाराष्ट्र ब्राह्मण सभा या संस्थेला देण्यात येणार आहे. रोख रक्कम, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.
ब्राह्मण समाजाच्या उन्नतीकरिता आणि प्रगतीकरिता 2005 पासून ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ हे मासिक आणि 2011 पासून ‘आम्ही सारे ब्राह्मण’ हे पाक्षिक प्रकाशित होत असे. कोरोनाकाळानंतर दोन्ही नियतकालिकांचे संयुक्त मासिक अव्याहतपणे प्रसिध्द होत आहे. शैक्षणिक आणि वैद्यकीय कारणांसाठी गरजू ब्राह्मणांना आर्थिक मदत देखील देण्यात येते.
यापूर्वीच्या ब्राह्मण भूषण पुरस्कार सन्मानितांमध्ये ज्येष्ठ समाजसेविका अपर्णाताई रामतीर्थकर (2013), अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (2014), एअर मार्शल भूषण गोखले (2015), शारदापीठाचे पं. वसंतराव गाडगीळ (2016), पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई (2017), पौरोहित्यांचे संघटन करणार्‍या श्रीसद्गुरु ग्रुपचे संस्थापक यशवंत कुलकर्णी (2018), सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे (2019), ज्येष्ठ अभिनेते व प्रखर हिंदुत्ववादी शरद पोंक्षे (2022) आणि विश्‍वविक्रमवीर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले (2023) यांचा समावेश आहे.
————-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!