कोषागारातील रक्कम मिळणार असल्याचे दूरध्वनी बनावट


ऑनलाईन रक्कम भरल्यानंतरच कोषागारातील रक्कम मिळणार असल्याचे दूरध्वनी बनावट

पुणे, दि. २२: निवृत्तीवेतनधारकांना ऑनलाइन रक्कम भरल्यानंतरच कोषागारातील थकीत रक्कम मिळणार आहे, अशाप्रकारचे दूरध्वनीद्वारे कळविण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे दूरध्वनी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात येत नसून कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविण्यात येत नसल्याबाबत पुणे कोषागार कार्यालयाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत दूरध्वनी करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाइन व्यवहार करण्याविषयी कळविण्यात येत नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्र व्यवहार केला जातो. निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचाऱ्यांना दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून रक्कम ऑनलाइन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही.

तरी निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचाऱ्यांनी अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील. अशाप्रकारे कोणी दूरध्वनीवरुन संपर्क साधल्यास किंवा कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांनी केले आहे.
0000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!