यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस – डॉ. गायकैवारी


प्राचीन ग्रंथांद्वारे पावसाचा अचूक अंदाज बांधणे शक्य; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस – डॉ. राघवेंद्र गायकैवारी

Advertisement

पुणे, दि. 31 मे – यंदाच्या मॉन्सूनचे अंदाज भारतीय हवामान खात्याकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे, त्या पार्श्‍वभूमीवर होळी आणि अक्षयतृतीयेच्या सणांचे महत्व लक्षात घेवून खगोलशास्त्राच्या आधाराने देखील हे अंदाज अचूकपणे लावता येऊ शकतात, असे या विषयाचे संशोधक डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी आज येथे सांगितले. यंदा भारतात सर्वत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाचव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहीर या गणितज्ञाने आपल्या बृहतसंहिता या प्राचीन ग्रंथात पर्जन्यमानाचे अंदाज खगोलशास्त्राच्या आधाराने अचूकपणे लावता येतील इतकी इत्यंभूत माहिती लिहून ठेवली आहे. त्यावर गेली सात वर्षे संशोधन, निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर पावसाचे प्रमाण वर्तवणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक जोशी होते. अमृता नातू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी प्रास्ताविकात बोलतांना संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन म्हणाले की, भांडारकर संस्थेमध्ये डॉ. गायकैवारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अजित वर्तक, सुनिल भिडे आदी अभ्यासक या विषयावर संशोधन करीत आहेत. गेली 7 वर्षे यावर काम सुरु आहे. भारतातील प्राचीन आणि दुर्मिळ ग्रंथ भांडारकर संस्थेत आहेत. याचा आपल्या सर्व समाजाला उपयोग व्हायला हवा. त्यासाठी अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे.
यावेळी डॉ. गायकैवारी पुढे म्हणाले की, वराहमिहीरांनी सांगितलेल्या सूत्रांनुसार भारतातील विविध गावांमध्ये होळी व अक्षयतृतीयेला वाहणार वारे, त्यांची दिशा व गती, त्यावेळची ग्रहांची स्थिती, नक्षत्रांचा अभ्यास करुन पावसाचा अंदाज बांधता येतो. तो जवळपास नव्वद टक्यांच्या आसपास अचूक ठरतो, असे गेल्या सात वर्षांच्या निरीक्षणातून सिध्द झाले आहे. यावर्षी पुण्याच्या जवळपासच्या भागात आणि नंदूरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अशी निरीक्षणे घेतली गेली आहेत. बृहतसंहिता या प्राचीन ग्रंथामध्ये भूगोल, खगोलशास्त्र, पाणी शोधण्याच्या पध्दती, पर्जन्यमानशास्त्र, वनस्पतीशास्त्र, ज्योतिष, भूकंप अशा विविध विषयांचा अंतर्भाव आहे.
यंदा महाराष्ट्रात पावसाचे चांगले प्रमाण राहील. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात चांगला पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम चांगले जातील. पुण्यात साधारणपणे 8-9 जूनला मॉन्सून येईल तर साधारणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस परतेल असा अंदाज आहे.
———–


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!