अग्निशमन दलाचे कौतुक
मुख्य मंत्र्यांनी केले अग्निशमन दलाचे कौतुक
पुणे – पूरस्थितीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने अविरत परिश्रम केले याबद्दल मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.
शहरातील पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता मुख्य मंत्री शिंदे सोमवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अग्निशमन दलाच्या कामाची माहिती घेतली. या दलाच्या जवानांनी पुरात अडकलेली माणसे, प्राणी यांना सुखरूपपणे बाहेर काढले ही मोलाची कामगिरी केली. मुसळधार पावसातही त्यांचे काम चालूच होते, याची दखल मुख्य मंत्र्यांनी घेतली.
गेल्या दोन महिन्यांत पावसामुळे झाडं पडणे, घरांच्या भिंती पडणे, वसाहतींमध्ये पाणी शिरणे अशा प्रकारची आपत्ती ओढवली, या परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी अहोरात्र केलेल्या कामाची नागरिकांकडूनही प्रशंसा होत आहे.