पुण्यात दोन्ही पक्षांचे विजयाचे दावे
पुण्यात भाजप, काँग्रेस
दोघांचेही विजयाचे दावे
पुणे – लोकसभा निवडणूक निकालाचे अंदाज (एक्झिट पोल) व्यक्त झाल्यानंतर राजकारण ढवळून निघाले असून, पुण्यात भाजप आणि काँग्रेस पक्षात विजयाचे दावे, प्रतिदावे होऊ लागले आहेत.
एक्झिट पोलमध्ये बहुतांशी अंदाजांमधून पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडून येतील, असे दिसत आहे. अंदाज व्यक्त झाल्यावर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. स्टंटबाजांना पुणेकर स्वीकारत नाहीत, असा टोला रविंद्र धंगेकर यांना उद्देशून मोहोळ यांनी लगावला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर पुणेकरांचा विश्वास आहे, असे मोहोळ म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात मोहोळ यांच्या अभिनंदनाचे फलकही लावले. निकालानंतर विजयोत्सव करण्याची तयारीही सुरू केली.
एक्झिट पोलचे अंदाज काँग्रेस पक्षाला मान्य नाहीत.पुणेकरांनी ही निवडणूक हाती घेतली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांना प्रचंड पाठिंबा दिला. पुणेकरांनी धंगेकर यांच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि धंगेकरच खासदार झालेले दिसतील, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांची कार्यपद्धती, महागाई, बेकारी, भ्रष्टाचार याबद्दल पुणेकरांच्या मनात राग होता, तो राग मतपेटीतून व्यक्त झालेला दिसेल. धंगेकरच खासदार होतील, असे मोहन जोशी यांनी सांगितले.
अनेकवेळा एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले आहेत. याहीवेळी ते चुकलेले दिसतील, असे मोहन जोशी म्हणाले.
आज रविवारी , सुट्टीच्या दिवशी शहरात राजकीय अंदाज व्यक्त करणाऱ्या चर्चांना उधाण आले. त्यामुळे पुणे, बारामती, शिरूर येथील निवडणूक निकालांविषयी उत्सुकता वाढली आहे.