तेरा जाना…
तेरा जाना दिल के अरमानों का लूट जाना…
विदीर्ण झालेल्या हृदयाचं सांभाळणं नशिबी आलंय. नव्हे असं दुर्भाग्य आता सहन करावं लागणार आहे. चंद्राचा गाण्यात आणि आभासी चंद्राचा चित्रीकरणात अप्रतिम वापर. गोल; खिडकी त्यात एक लहान गोल आणि त्यातून दिसणारं रात्रीचं आकाश. नूतन त्या रात्रीच्या काळ्या गोल दिसणार्या आकाशाकडे पाहते. आता त्या आठवणी, त्याच्याबरोबरचे क्षण!
मन पाखरू
मधुसूदन पतकी
नूतन. अप्रतिम, सहज अभिनय करणारी अभिनेत्री. तिचा साधेपणा हे तिचे ग्लॅमर. अत्यंत तरल हावभाव सहज दाखवणारा चेहरा. इतकं सगळं कमी की काय, त्यात शैलेन्द्र यांचे काळजाला हात घालणारे शब्द आणि शंकर-जयकिशन यांचं संगीत. लताचा मन-मस्तिष्काला थेट भिडणारा आवाज. श्रुती, दृष्टी आणि मन सगळं धन्य व्हावं. बाकी काय असतं गाण्यात?
त्या काळी चित्रपटातले नायक, नायिका कोणतं तरी वाद्य छंद म्हणून चित्रपटात वाजवायचे. त्यात पियानो, बासरी, ढोलक, नंतर गिटार यांचा क्रम सहज यायचा. खरं तर भारतीय चित्रपटात ही वाद्यं अपूर्वाईची. त्यातून प्रेक्षकांना नक्की कशाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकतोय याची कल्पना यावी, यासाठी ही वाद्यं रजतपटावरही दिसायची. पियानो त्यात एक नंबर. या गाण्याची सुरुवात नूतन आणि पियानो एक फ्रेममध्ये. पियानोची नूतनच्या चेहर्यावर उमटणारी व्याकुळशी नोटेशन्स. तिची जलदगतीने पियानोच्या कीवरून फिरणारी बोटं. अस्वस्थ मनाचं पराकोटीचं लक्षण. तेच चेहर्यावर आणि सुरावट थांबते. क्षणाचा एक दशांशावा हिस्सा थांबतो. काळ थांबतो. नायकाची पावलं जिना उतरतात. सगळं संपल्याची भावना. जीवनाचं चक्र उतरणीला लागलेलं. पायर्यांवर प्रकाश-सावलीचा खेळ हा खास राज टच. दिग्दर्शनाचा आणि लता नूतनच्या मुखातून गाते. तेरा जाना… काळजाला पीळ पडतो.
असं सगळं काही मनासारखं होत असताना… एक डाव लयीत खेळला जात असताना अचानक विस्कटावा… अपेक्षांच्या, स्वप्नांच्या नाजूक पात्राचा चक्काचूर व्हावा. सारं काही जे आपलं ते कोणी लुटून न्यावं आणि एक हताश, अगतिक, पराभूत भाव अवघ्या चराचराला व्यापून राहावेत. त्यावेळी… त्यावेळी हेच शब्द मनात येणार नाहीत का…? एकमेकांची सुख, दुःखं आणि तीच वाटून सहभागी होत,वाटून घेत जीवनाची वाटचाल करायची हेच ठरवलं होतं. अगदी काल, परवा आणि आज…? विदीर्ण झालेल्या हृदयाचं सांभाळणं नशिबी आलंय. नव्हे असं दुर्भाग्य आता सहन करावं लागणार आहे. चंद्राचा गाण्यात आणि आभासी चंद्राचा चित्रीकरणात अप्रतिम वापर. गोल; खिडकी त्यात एक लहान गोल आणि त्यातून दिसणारं रात्रीचं आकाश. नूतन त्या रात्रीच्या काळ्या गोल दिसणार्या आकाशाचकडे पाहते. आता त्या आठवणी, त्याच्याबरोबरचे क्षण रात्रभर आठवत राहणार आणि ते क्षण आणि त्यामुळे मन न आवरता येणारं. त्याला समजवायचं कोणी? आणि सांगायचं तरी काय? कसं? या सगळ्या अस्वस्थ विचारांच्या आवर्तनात नायिका; नूतन अडकलेली. तिच्या पाठीशी सहनायिका. पुन्हा जिना. नूतन जिना उतरते. जिना एक व्यक्तिमत्त्व होतो. सेतू होतो. सगळं दिसणं आणि ऐकणं लाजवाब.
सगळा भाग दिगदर्शन आणि प्रकाश-छायेचा. नेपथ्याचा उत्तम वापर. प्रत्येक वस्तू नियोजनपूर्वक पण सहज वाटावी अशी ठेवलेली. अगदी गाणं संपताना नूतन ज्या गोल टेबलवर, टीपॉयवर डोकं टेकवते तिथंपर्यंत. राज कपूरचं रस्त्यावरून जाणं आणि दूर जाणारे दिवे हे गाण्याचा एक भाग होतात. या सगळ्यात एक मेलडी आहे व्याकुळ करणार्या वास्तवाची. मनातून न जाणारी. आपल्याला सगळं समजून‘अनाडी’ ठेवणारी.
.
लिंक
https://youtu.be/_Mrl_oozN4U?si=qd6WP6iiXb19Zxbm