हम पांच
हम पाच
केंद्रात ठामपणे निवडून येणाऱ्या भाजप सारख्या पक्षालाच मतदान का करू नये असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सहाजिकच या चर्चेला उधाण आले तर ..
पण सध्या जिल्ह्यातले पाच नेते पांडव एकत्र आलेत .हे हम पाच एकत्रित ताकदीने काय करू शकतील हे सांगायलाच नको.
सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. आरोप ,प्रत्यारोप त्याचबरोबर सभा ,मेळावे यांना जोर आला आहे. सभांमध्ये स्थानिक मुद्द्यां बरोबर राज्याचे आणि राष्ट्रीय मुद्दे जोरात समोर येत आहेत. वातावरण निर्मिती एनकेन प्रकाराने केली जात आहे. मात्र हा सगळा प्रकार पाहता गेल्या दोन दिवसांपासून महायुतीच्या प्रचाराला जोर आल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण हम पाच हे आहे. कोणे एकेकाळी हम पाच ही टीव्ही सिरीयल गाजली होती. वेगवेगळ्या गुणवत्ता असणाऱ्या पाच मुली आणि त्यांचे आई, वडील असा या सिरीयलचा प्लॉट होता. निवडणुकीत या प्लॉटच्या नेमकी उलट परिस्थिती आहे. सिरीयल मध्ये पाच मुली काहीं ना काही घोटाळे करत असायच्या, आणि आई, वडील ते निस्तरायचे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ,पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई , ज्येष्ठ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार मकरंद पाटील आणि आमदार महेश शिंदे ही पाच मंडळी विरोधकांचे वेगवेगळे घोटाळे बाहेर काढत प्रचाराचा वेग वाढवत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात वर दिलेल्या चार आमदार हे महायुतीचे आहेत. त्यातही भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार या गटाचे आमदार असल्याने ही टीम परिपूर्ण आहे. तर उरलेल्या दोन विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट आणि काँग्रेस अशी टीम आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. दोन दिवसापूर्वीपर्यंत संख्येने कमी असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या प्रचारात एकजन्सीपणा दिसत होता. याचे कारण दोन्ही उमेदवार एकाच भागातले म्हणजे कराड उत्तर व कराड दक्षिण या मतदारसंघातले होते . संख्येने कमी असल्यामुळे त्यांचे संपर्क जलद होत होते .तर महायुतीच्या या चार आमदारांची क्षेत्रे भिन्न भिन्न ठिकाणी, आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे सहजासहजी एकत्रित येणे व एकत्रित काम करणे जाणवत , दिसत नव्हते. मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या एकत्रित पत्रकार परिषदेचा परिणाम मतदारसंघावर नक्कीच झाला आहे. वाई ,पाटण या विधानसभा मतदारसंघाबाबत संदेह व्यक्त केला जात होता. पाटण येथील मताधिक्य उदयनराजेंना मिळणार का असा प्रश्न पत्रकार परिषदेतही उपस्थित केला गेला. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आणि या भागातून आम्ही नक्की मताधिक्य देऊ असे आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी दिले आहे. खरे तर गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या पोट निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांसाठी एकत्रित मतदान झाले होते. शंभूराज देसाई यांना तिथे मताधिक्य मिळाले, मात्र खासदारकीसाठी श्रीनिवास पाटील यांनी चांगले मताधिक्य या पाटण खोऱ्यातून घेतले होते. कदाचित आपल्या भागातील उमेदवार हा विचार तेथील मतदारांचा असावा मात्र आता शंभूराज देसाई यांना येथून मताधिक्य देणे आवश्यक आहे. तसेच ते होण्यासारखे आहे. कारण लोकसभेसाठीचे दोन्ही महत्त्वाचे उमेदवार पाटण वा कराड येथील नाहीत.
वाई विधानसभा मतदारसंघात पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात घडलेल्या नाराजी नाट्याचा विषय पत्रकार परिषदेत विचारला गेला. या पत्रकार परिषदेला मकरंदआबा पाटील घरगुती कारणामुळे उपस्थित नव्हते. प्रचार सुरू झाल्यापासून ते तसे उपस्थित नाहीत. मात्र त्यांनी काम केल्याचे,करत असल्याचे त्यांचे बंधू आणि या लोकसभेसाठी इच्छुक असणारे नितीनकाका पाटील यांनी व्यासपीठावरून पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नितीनकाका पाटील यांच्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी रस दाखवला होता. नितीन पाटीलही त्यासाठी उत्सुक होते ,परंतु या जागेच्या बदल्यात राज्यसभेत जागा मिळणार अशी तडजोड वरिष्ठ पातळीवर झाल्यानंतर नितीन पाटील तसेच आमदार मकरंद पाटील यांनी काम करण्याचे मान्य केले. परंतु वाई तालुक्यातून अद्याप म्हणावा तसा जोर लागल्याचे दिसत नाही. अर्थात ही परिस्थिती हळूहळू नक्कीच बदलेल आणि वातावरण बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर होईल. परंतु वाई आणि पाटण हे दोन मतदारसंघ गेम चेंजर ठरू शकतात याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे.
सातारा -जावळी विधानसभा मतदार संघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जोरात कामाला लागले आहेत. जावली तालुक्यात त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले असल्यामुळे आणि सातारा येथे उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांच्या एकत्रित ताकतीचा परिणाम होणार असल्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. आणि ठेवले गेलेही असेल.
कोरेगाव मतदार संघात महेश शिंदे यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे पाहण्यास सुरुवात केली आहे. खरे तर कोरेगाव हा मतदारसंघ एकेकाळी शशिकांत शिंदे यांचा पण होता. परंतु ते बाहेरून आले आहेत या एका भावनेने त्यांचा पराभव झाला होता. आताही हीच भावना कोरेगावात किती ताकतीने निर्माण केली जाईल या वर त्याचबरोबर महेश शिंदे यांनी केलेली विकास कामे त्यांचा जनसंपर्क आणि थेटपणे शरद पवार यांना अंगावर घेण्याचे धाडस यामुळे कोरेगाव मतदार संघात आणि सातारा लोकसभा मतदारसंघात त्याचा नक्कीच परिणाम होईल. थोडक्यात पाच लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने आणि एकत्र असल्याचे स्पष्टपणे दाखवल्याने मतदारांवर त्यांचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आमदार बाळासाहेब पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या मतदारसंघात जोर लावणार असले तरी अतुल भोसले यांनी देखील कराडची जबाबदारी स्वीकारली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची राज्याची धुरा देखील वहायची आहे .सहाजिकच ते त्यांच्या मतदारसंघाकडे कितपत लक्ष देऊ शकतील हा प्रश्न आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत अनेक वर्षे असणारे आनंदराव पाटील हे भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांचा फायदा भारतीय जनता पक्ष कसा करून घेईल हे पाहणे देखील उत्सुकतेचे आहे .
सध्या जनमानसात एक कुजबूज जोरात होत आहे. ती म्हणजे ज्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने लोकसभेत दोन अंकी जागांचा टप्पा गाठला नव्हता, ते आता दहा जागांवर लढत असताना किती जागा मिळवणार ?त्यातूनही एक, दोन जागा मिळवल्या तरी तेथील मतदार संघात निवडून आलेले ते खासदार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात किती काम करू शकणार ?त्यातून उरलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही याची हमी कोण घेणार ? थोडक्यात भारतीय जनता पक्ष 400 प्लस जागा मिळवू शकला नाही तरी सत्तेत नक्कीच येणार. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. अशा परिस्थितीत एखाद दुसरी जागा निवडून आणणाऱ्या पक्षाला त्याच्या भागाचा विकास कसा करता येणार? त्यापेक्षा केंद्रात ठामपणे निवडून येणाऱ्या भाजप सारख्या पक्षालाच मतदान का करू नये असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सहाजिकच या चर्चेला उधाण आले तर ..
पण सध्या जिल्ह्यातले पाच नेते पांडव एकत्र आलेत .हे हम पाच एकत्रित ताकदीने काय करू शकतील हे सांगायलाच नको.
.
मधुसूदन पतकी
२६.०४.२०२४
