नगर वाचनालयाच्या पाठक सभागृहात ओंजळीतील शब्दफुले कार्यक्रम सादर करताना डावीकडून मानसी चापेकर, विजय जोशी आणि चैत्राली जोगळेकर.
————–
खुमासदार कवितांनी रंगला ओंजळीतील शब्दफुले कार्यक्रम
नगर वाचनालयाचा वर्धापन दिन आणि कालिदास दिन काव्यमय
सातारा.
मराठी कवितेचे दालन समृद्ध असून ऐतिहासिक सातारा शहरामध्ये असलेली साहित्यिक परंपरा जोपासणा-या येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या 171 व्या वर्धापन दिनानिमित्तचा कार्यक्रम ओंजळीतील शब्दफुले सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत असून महाकवी महाकवी कालिदास दिनानिमित्त ही मैफल सादर होते आहे, हाही भाग्ययोगच आहे, अशा शब्दांत शब्दांकुर, मुंबईचे विजय जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या आरंभी महाकवी कालिदासाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नगर वाचनालयाच्या 171 व्या वर्धापन दिनानिमित्त वाचनालयाच्या पाठक सभागृहामध्ये आयोजित ओंजळीतील शब्दफुले या कार्यक्रमाच्या ६५ व्या प्रयोगात डोंबिवलीचे विजय जोशी, रोहा-रायगड येथील मानसी चापेकर आणि पवई-मुंबई येथील चैत्राली जोगळेकर यांनी त्यांच्या कवितांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमात चैत्राली जोगळेकर यांनी सादर केलेली सासूबाईंची आरती आणि सैनिकाच्या पत्नीचे पत्र कुंकू लढतंय सीमेवर… या कविता विशेष दाद घेऊन गेल्या. विजय जोशी यांनी सादर केलेल्या मालवणी बोलीभाषेतील माझा त्वांड दिसता या कवितेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तर मानसी चापेकर यांच्या किचनमधला ओटा आणि घरकाम करणा-या गृहसखीचे चित्र रेखाटणारी कविता रसिकांच्या पसंतीस उतरली. विशेष म्हणजे ओंजळीतील शब्दफुलेचा हा मुंबईबाहेरचा पहिला कार्यक्रम ठरला.कार्यक्रमास अतुल शालगर, डाॅ. राजेंद्र माने, सागरनाथ गायकवाड, मधुसूदन पतकी, रागिणी जोशी, डाॅ. शाम बडवे, प्रा. श्रीधर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.वा
चनालयाच्या कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. श्रीनिवास वारुंजीकर यांनी सादरकर्त्यांचा परिचय करुन दिला. विश्वस्त ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी कलाकारांचा सत्कार केला तर कार्यवाह प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.