सद्‍गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे.

शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ति ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ति निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना, त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे ? जसे भांडे कुठे ठेवावे, पळीताम्हन कुठे ठेवावे, वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व, माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो. कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो. परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून; आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हार्‍यात ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची, आणि मागले पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, “तुला तुझा वडिलांचे पत्र मिळाले का ?” त्यावर तो म्हणाला “हो.” त्यावर त्या गृहस्थाने विचारले, “अरे, मग पैसे का पाठविले नाहीस वडिलांना ?” त्यावर तो म्हणाला, “तेवढेच राहिले बघा !” तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्‍गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता, उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्‍गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे, संशयरहित होऊन करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही.

Advertisement

आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो, आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे, आपले सर्व जीवन एकदा सद्‍गुरूच्या ताब्यात दिल्यावर, तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते.

ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज, सद्‍गुरू त्याचे ‘नाम’ देऊन भागवितात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते, आणि जन्माला आल्याचे सार्थक होते.

*. गुरूवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!