समुह संघटिकांचे प्रशिक्षण संपन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत समुह संघटिकांचे प्रशिक्षण संपन्न
पुणे दि.१६: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात समाज विकास विभागाच्या सर्व समुह संघटिकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समुह संघटिकांना मार्गदर्शन केले.
महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियानाचे समुह संघटक, मदत कक्ष प्रमुख, शहर मिशन व्यवस्थापक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत केले आहे. लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर प्रति लाभार्थी रुपये ५० प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
उपायुक्त नितीन उदास यांनी योजनेचे अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन केले. अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्यांची नोंद करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची नोंदणी केंद्राला भेट
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्वारगेट येथील आरोग्य कोठीच्या केंद्राला भेट देवून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मोनिका रंधवे, मनीषा बिरारीस आदी उपस्थित होते.
ही योजना राबविण्याकरीता तसेच या योजनेचे अर्ज भरण्याकरीता महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १९३ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांवर महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.
0000