ते पेजर का वापरत होते ?
ते पेजर का वापरत होते ?
आज बैरूत (लेबनॉन) मध्ये जे काही झालं, हजारो पेजर्स एकाच वेळी फुटले आणि हजारो व्यक्ती कमीजास्त प्रमाणात जखमी झाल्या त्यामुळे बैरूतमध्ये पाचावर धारण बसली आहे. सुमारे ३०० माणसं क्रिटिकल आहेत, ३-४ जण मृत्युमुखी पडले आहेत. यातले बहुतेक हिझबुल्ला या शिया दहशतवादी संघटनेचे अतिरेकी आहेत. हिझबुल्ला गोलन टेकड्यांच्या भागात इज्रायलविरुद्ध आघाडी सांभाळते तीच मुळी इराणच्या पाठींब्यावर.
पेजरसारखी १-जी टेक्नॉलॉजी का वापरत होते हिझबुल्लाचे लोक? कारण ती अत्यंत बेसिक आणि हार्डवेअर बेस्ड मेसेजिंग टेक्नॉलॉजी आहे. ब्लूटूथ वगैरे कंट्रोल करून मोबाईल फोन्सची टेलीकम्युनिकेशन्स हवी तशी मॉनिटर / कंट्रोल करता येतात, किंवा हॅक करता येतात. मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम प्लॅटफॉर्म्समध्ये असलेले ‘बॅक डोअर्स’ किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कच्चे दुवे शोधणे हे हॅकर्सचं काम असतं. पण तो सगळा सॉफ्टवेअरचा, नेटवर्क ॲक्सेसचा आणि ट्रोजन मालवेअर्सचा भाग झाला. हार्डवेअर लेव्हलला काही बॅक डोअर्स डायनॅमिकली बनवणं हे अत्यंत जटिल काम आहे. मूळ हार्डवेअर प्लॅटफॉर्म जितका ‘क्लोज्ड’ तितकं हे काम करणं अधिक कठिण. बेसिक पेजरमध्ये फक्त मेसेजिंग रिसीव्ह करता येतं, त्यासाठी स्टॅन्डर्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्कही लागत नाही. रेडिओ सिग्नलवर मेसेज केला जातो. प्रत्येक पेजरचा युनीक ॲड्रेस (कोड) असतो. मेसेजमध्ये ज्याचा कोड असेल तोच पेजर मेसेज डीकोड करतो. इंटरनेट, ब्रॉडबॅन्ड वगैरे काही लागत नाही. सगळं काम रेडिओ फ्रिक्वेन्सीने केलं जातं. त्याची रेंज लिमिटेड असते. हे पेजरचं बलस्थानही आहे आणि त्याची मर्यादासुद्धा. त्याशिवाय काही नेटवर्क वापरणारे ॲप्स पेजरवर नसतात. कीबोर्डही नसतो. हिझबुल्ला वापरत होती ते असे अत्यंत बेसिक पेजर्स होते.
पण हे सगळेच्या सगळे पेजर्स हिझबुल्लाने गेल्या काही महिन्यांतच विकत घेतले होते आणि ॲक्टिव्हेट केले होते! तेही हिझबुल्लाच्या विश्वासू इराणी डीलरकडून.
आता प्रश्न असा आहे की हे सगळे पेजर्स एकाच वेळी फुटले याचा अर्थ कसा लावायचा? सुरवातीला वाटलं की बॅटरीज फुटल्या असतील. पण बॅटरीज एवढ्या मोठ्या स्केलवर एकाच वेळी फोडणं यासाठी डिस्ट्रिब्युटेड अटॅकर्सना फार स्ट्रॉन्ग सिग्नल्स फोकस करावे लागतील आणि ते करणं महामुश्किल काम आहे.
उरलेला पर्याय म्हणजे ज्यांनी कोणी हे घडवून आणलं त्यांना या पेजर्सच्या ऑर्डर मॅनेजमेंट, सप्लाय चेन, कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग, असेम्ब्ली, पॅकेजिंग, शिपमेंट, कस्टम्स यापैकी एका किंवा एकाहून अधिक प्रक्रियांना ॲक्सेस होता! ॲक्सेस म्हणजे ढवळाढवळ करण्याइतपत फिजिकल ॲक्सेस! तो मिळवून त्यांनी गुप्तपणे प्रत्येक पेजरमध्ये काही स्फोटकं पेरली. एका विशिष्ट मेसेजवर ती स्फोटकं ॲक्टिव्हेट होतील याची व्यवस्था केली आणि व्यवस्थित पॅक करून ते सगळं शिपमेंट गपगुमान हिझबुल्लाकडे जाऊ दिलं! कोणालाही या पेजर्सची शंका आली नाही इतकं हे काम स्मूथली केलं गेलं. इतक्या सूक्ष्म स्तरावर स्फोटकं पेरणं हे फार क्लिष्ट काम आहे आणि ते करणारी फार मंडळी पृथ्वीतलावर नसावीत!
हे सगळं कधी झालं असेल याचा अंदाज कोणी बांधू नये. फार पेशंटली आणि थंडपणे हा गेम खेळला जातो. मग एक दिवस सगळ्या पेजर्सना एकच विवक्षित मेसेज पाठवला गेला आणि मग तंत्रज्ञानानं जे व्हायचं ते झालं. पेजर्स साधारणपणे कंबरेच्या लेव्हलला ठेवलेले असतात. त्यामुळे जास्तीत जास्त जखमा कंबर, हात, चेहरे आणि कंबरेखाली झालेल्या आहेत!
हे सगळं वाचून हे कोणी घडवून आणलं असेल याचा अंदाज बांधता आला असेलच! सायकॉलॉजिकल, सायबर युद्ध आता फार वेगळ्या लेव्हलला गेलेलं आहे.
अनंत सुरेश अंभईकर