दगडूशेठच्या रुग्णवाहिका मिरवणूक काळात सेवेत
‘दगडूशेठ’ ट्रस्टच्या ५ रुग्णवाहिका
मिरवणूक काळात सेवेत
पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीत सापडलेल्या रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी मिरवणूक मार्गावर ५ रुग्णवाहिका अहोरात्र सेवेत होत्या, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.
ट्रस्टच्या जय गणेश आरोग्य सेवा अभियानांतर्गत ही सेवा देण्यात आली. विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि अलका टॉकीज जवळील लोकमान्य चौक या ठिकाणी मिरवणुकीतील देखावे पहाण्यासाठी अलोट गर्दी होते. त्या गर्दीत देखाव्यातील वाहनाचा धक्का लागणे, गर्दीमुळे घुसमटल्याने श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे, शुगर कमी-जास्त होणे अशा प्रकारचे त्रास अचानक उद्भवतात. अशावेळी रुग्णावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊन ट्रस्टने मिरवणूक मार्गावरील रस्ते आणि अलका टॉकी जवळील लोकमान्य चौक अशा ५ ठिकाणी रुग्णवाहिका तैनात केल्या होत्या. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक आणि अलका टॉकीज जवळील लोकमान्य चौक येथे रुग्णवाहिकेत दोन डॉक्टर्सही सेवेत होते, अशी माहिती चव्हाण यांनी सांगितली.
पोलीस खात्याच्या सूचनेनुसार रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविल्या गेल्या. अनेक रुग्णांना या सेवेचा फायदा मिळाला. गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही रुग्णवाहिकांसाठी मिरवणुका थांबवून मार्ग करून दिला. त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार देता येणे शक्य झाले, असेही चव्हाण यांनी सांगितले. ही रुग्णवाहिका सेवा उपयुक्त ठरली.