प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


🌸🌼🌺🍀🍁🌷🍁🍀🌺🌼🌸

🌸🌼🌺🍀🍁🌷🍁🍀🌺🌼🌸

भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची.

परमेश्वरापाशी काय मागावे ? तुम्ही त्रास करून घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात ना ? ते मागितलेत तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का ? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का ? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुनः येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत ‘मला समाधान दे’ हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भाकून, ‘मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे,’ असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे. त्यातच तुमचे कल्याण आहे.

Advertisement

भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते, तेच भगवंताबद्दल वाटावे. सात्त्विक गुणापलिकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्‍या कशाचीही गरज नाही. निःस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे, आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे-घेणे हा होय. म्हणून, आपण नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच. नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो : नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. आपण भगवंताची प्रार्थना करून, नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो, आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते.

* भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी.

🌸🌼🌺🍀🍁🌷🍁🍀🌺🌼🌸


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!