मतदान करा
मित्रांनो ,
मतदान करा ..!
जात पातीसाठीचे कर्म
राजकारणाचे मर्म
सगळं सगळं
बाजूला ठेवून
जागवण्या लोकशाही धर्म
मतदान करा..!
प्रेमाने करा
रागाने करा
निर्लेप मनानी करा
पण मतदान करा ..!
आमिषाने ? नको
सामिषानी ? नको
निर्विष वृत्तीने करा
मतदान करा..!
भावकी म्हणून करा
गावकी म्हणून करा
आपुलकीनी करा
पण
मतदान करा..!
जिरवायची म्हणून करा
मुरवायची म्हणून करा
भाकरी फिरवायची
म्हणून करा
पण मतदान करा..!
सांगायचं म्हणून करा
विचारायचं म्हणून करा
बजावायचे म्हणून करा
पण मतदान करा..!
प्रश्न विचारायला
उत्तर मागायला
प्रतिक्रिया द्यायला
मतदान करा ..!
कौतुकासाठी करा
जागेवर आणण्यासाठी करा
मार्ग दाखवण्यासाठी करा
पण मतदान करा..!
भरली हवा कमी करण्यासाठी
पंक्चरला असेल तर
हवा भरण्यासाठी
हवेतल्याला हवाहवाई
करण्यासाठी
मतदान करा..!
लोकशाही जपण्यासाठी
समृद्ध करण्यासाठी
कर्तव्य हक्क बजावण्यासाठी
मतदान करा..!
निर्भय होण्यासाठी
पारदर्शक दिसण्यासाठी
मोकळेपणा दाखवण्यासाठी
मतदान करा…!
लोकशाही सुदृढ सशक्त
करण्यासाठी
आत्मसन्मान राखण्यासाठी
मतदान करा
मित्रहो..
मधुसूदन विनवतो,
मतदान करा..!
मतदान करा..!
.
मधुसूदन पतकी
18.11.2024