आजच्या ताज्या बातम्या (30 जानेवारी)
एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी या उपक्रमांतर्गत*
एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
सातारा दि. 30: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा व मिरॅकल फाऊंडेशन,इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने “एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी” या उपक्रमांतर्गत बालगृहामधील बालकांना कौटुंबिक वातावरण निर्माण करणे, कुटुंबाचे सक्षमीकरण करणे, बालगृहातील कर्मचारी व बालके यांचेसोबत कौटुंबिक जिव्हाळयाचे नाते निर्माण करणे या उद्देशाने एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा हॉटेल ग्रीन फिल्ड, सातारा येथे संपन्न झाले.
या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एन.एन. बेदरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, मिरॅकल फाऊंडेशनचे प्रोग्रॅम मॅनेजर श्री.संकेत शेगावकर, बाल कल्याण समिती सदस्या शीतल लोखंडे यांच्यासह महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एन.एन. बेदरकर म्हणाल्या, एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी हा उद्देशच खुप विशिष्ठ व उल्लेखनीय आहे. बालगृहामध्ये काळजी व संरक्षणासाठी दाखल असलेल्या बालकांना बालगृहामध्येच कुटुंबाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा व मिरॅकल फाऊंडेशन,इंडीया हे एकत्रिपणे काम करीत आहेत या उल्लेखनिय कामकाजाबाबत त्यांचे अभिनंदन केले.
प्रशिक्षणामध्ये संपुर्ण दिवस बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल, केस मॅनेजमेंट, बालकांचे कुटुंबआधारीत पर्यायी संगोपन, कुटुंबाचे सक्षमीकरण या विषयांवर उपस्थित तालुकास्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणामुळे तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष काम करताना अत्यंत महत्वाची मदत होणार आहे त्यामुळे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांबाबत हिताचे निर्णय घेणे व त्यांचे पुर्नवसन करणेसाठी बाल कल्याण समितीस सोपे जाणार आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालक वंचित राहणार नाही, असे महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुजाता देशमुख, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सातारा यांनी केली. तसेच सुत्रसंचालन श्री.अजय सपकाळ, संरक्षण अधिकारी यांनी केले.
0000
*छत्रपती संभाजीमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची*
*जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली पहाणी*
सातारा दि. 30: सातारा येथील छत्रपती संभाजीमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पहिल्या टप्पयातील काम पूर्ण झाले आहे. या कामाची पहाणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
यावेळी वैद्यकीय महाविद्यलायाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, सदरचे वैद्यकीय महाविद्यालय 100 विद्यार्थी क्षमतेचे व 500 खाटांचे आहे. या महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमुळे जिल्ह्यातील गरजू व गरीब लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या मिळणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाची उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावी.
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे ही काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आत्तापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना किती निधी आला, खर्च किती झाला, याची माहिती घेतली. स्टाफ क्वॉटर, कॅंटींगची पहाणी केली. बांधकामाबाबत कोणतीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क करावा, असेही पहाणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
00000
*शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करावी*
सातारा दि. 30: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गट योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीचे शिधापत्रिकेत संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे, शिधापत्रिकेत नमूद व्यक्ति त्याच आहेत याची खात्री करुन रास्तभाव दुकानातून 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सर्व तालुका कार्यालयांना रास्तभाव दुकान स्तरावर कॅम्प आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, तरी ज्या लाभार्थीनी अद्यापही ई केवायसी केलेली नाही, त्यांनी स्वताचे आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई केवायसी करुन घ्यावी, असे न केल्यास भविष्यात शिधापत्रिकेवरील धान्य बंद होण्याची शक्यता आहे.
0000
*ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण केले जाणार*
*योजनेच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक राहणार*
सातारा दि. 30: राज्यात शेतक-यांसाठी अॅग्रीस्टॅक संकल्पना राबविणेस मान्यता दिली आहे. अॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजीटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतक-यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजीटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उददेश आहे. प्रकल्पामुळे माहिती आधारीत योग्य निर्णय घेणे, गरजू शेतक-यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
अॅग्रिस्टॅक योजनेचे अपेक्षित फायदे पुढील प्रमाणे : PM-Kisan योजनेतील आवश्यक अटी पुर्ण करून शेतक-यास लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता. PM-Kisan योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थीचा समावेश. पिक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचे सर्वेक्षणामध्ये सुलभता. किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल. शेतक-यांना सेवा देणा-या यंत्रणांना सदर सेवेसाठी सुलभता. शेतक-यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले उपलब्ध होणे, विविध संस्थांना शेतक-यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढ.
शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांची (CSC) मदत घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक व ग्राम विकास अधिकारी या क्षेत्रीय कर्मचारी यांच्या मार्फत गाव पातळीवर शेतक-यांच्या बैठका, कॅम्प घेऊन त्यामध्ये शेतक-यांना या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी तसेच मान्यवर व्यक्ती यांना देखील कॅम्पसाठी आमंत्रित केले जाणार आहे.
बैठकीमध्ये, कॅम्पमध्ये ज्या शेतकरी ओळख क्रमांक काढावे लागतील अशी शेतकरी संख्या निश्चित करून प्रत्यक्ष शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र चालकाचा (CSC) स्वतंत्र कॅम्पचे आयोजन संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांचे समन्वयाने केले जाणार आहे. तत्पुर्वी सर्व शेतक-यांनी आपल्या मोबाईल क्रमांकास आधार जोडणी करून घ्यावी जेणेकरून शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्याची प्रक्रीया सोप्या पध्दतीने होईल.
भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच PM किसान, पीक विमा, कृषी विभागाच्या सर्व वैयक्तीक लाभाच्या योजना इ. च्या लाभासाठी सर्व शेतक-यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले जाणार असल्याने सर्व शेतक-यांनी शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील सदर कॅम्पमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतक-यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
0000