परीक्षा केंद्रांची पाहणी
जिल्हाधिकारी संतोष पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली परीक्षा केंद्रांची पाहणी
सातारा दि.11- आज पासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा फेब्रु/मार्च २०२५ ही सातारा जिल्हयामध्ये ५२ केंद्रांवर सुरळीपणे सुरु झाली. इ.१२ वी साठी इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी १२ वीचे एकूण ३४ हजार ५७६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. परीक्षा कालावधीत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या त्याअंतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देवून केंद्र नियोजनाचा आढावा घेतला तसेच आवश्यकत्या सूचना दिल्या .
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी यशवंतराव चव्हाण इन्सिटयुट ऑफ सायन्स, सातारा तसेच शिवाजी कॉलेज, सातारा या केंद्रांना भेटी दिल्या.
कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय मंडळ, कोल्हापूर यांचेमार्फत नियुक्त केलेली शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (योजना), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), महिला भरारी पथक यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत तसेच परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तालुकास्तरीय भरारी पथके कार्यन्वित करण्यात आलेली आहेत. या पथकांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसिलदार यांचा समावेश आहे. या भरारी पथकांनी जिल्हयातील ५२ पैकी ४७ केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रांवर महसूल व ग्रामविकास विभागाच्या वतीने बैठी पथके कार्यरत आहेत. डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगांव; रामकृष्ण ज्युनिअर कॉलेज, नागठाणे; द्रविड हायस्कूल, वाई; बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण; महात्मा गांधी विद्यालय, पाचवड, मालोजीराजे विद्यालय लोणंद; विठामाता कनिष्ठ महाविद्यालय, कराड; मुधोजी महाविद्यालय फलटण; मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण; मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण; यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण या केंद्रांवर ड्रोनच्या माध्यमातून व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले.
सातारा जिल्हयामध्ये आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ पासून इ.१२ वी ची परीक्षा कोणत्याही गैरमार्गाविना सुरळीत वातावरणात सुरू झालेली आहे.
00000