गझलरंग.. वैशाली माळी
तिचा अपघात कॅमेऱ्यात टिपताना जमावाने
त्वरेने झाकला उघडा तिचा खांदा भिकाऱ्याने
पुन्हा बापास येथे काढले मोडीत लेकाने
गिरवला तोच कित्ता आजही परतून काळाने
फुलाशी शेवटी फुलपाखराचे बिनसले इतके
समाधी लावलेली वाळक्या पानावरी त्याने
हवीशी वाट असल्यावर फुले होतात काट्यांची
शिकवले हे तुझ्यापर्यंत केलेल्या प्रवासाने
मला अंधार दाखवतो खरे जग आतले माझ्या
पुन्हा मी झाकते त्याला दिवसभरच्या उजेडाने
जुन्या ड्रेसेसचा कप्पा पुन्हा मी छान आवरला
पुन्हा आतून विस्कटले मला एका दुपट्ट्याने
मनाचा हात हाती घेतला कित्येक वर्षांनी
फुले वेचायला नेले तुझ्या परसात वाऱ्याने
वैशाली माळी©