शिक्षणाला लवकर आरंभ केल्याने आपल्या मुलांना काय लाभ होतो ?
प्रा. मनोहर रा. राईलकर
आता थोडंसं इतर तज्ज्ञांचंही म्हणणं ऐकूया की.
(१) मूर आणि मूर The school can wait या पुस्तकात म्हणतात, शिक्षण लवकर सुरू करणं चांगलं, हे मत आम्हाला शंकास्पद वाटतं. लवकर शाळेत घालण्याचे परिणाम टिकाऊ होत असल्याचा कोणताही सज्जड पुरावा उपलब्ध नाही. किंबहुना, ७ किंवा ८ वर्षांची मुलंच अधिक सक्षमतेनं, कमी श्रमात, वैफल्य न येता शिकतात, जीवनात यशस्वीही होतात, असाच अनुभव आहे.
(२) सहा वर्षांपर्यंत बालकाच्या मेंदूची वाढ पन्नास टक्के पूर्ण होते त्यानंतर बालकाला औपचारिक शिक्षणाकडे वळवायला हरकत नाही, असा प्रामाणिक समज काही शिक्षणतज्ज्ञांचा होता. परंतु आठ किंवा नऊ वर्षांपर्यंत ही वाढ पूर्ण होत नाही हे सखोल संशोधनांती सिद्ध झालं आहे. सुदैवानं, त्या संशोधकांनीही आता हे मान्य केलं आहे.
(३) बालकाला जन्मापासूनच प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं पाहिजे, हे ठीक. पण ते, वाचन, लेखन, गणन (गणित) असं औपचारिक शिक्षण कदापी नसून, मायेच्या उबेत, घरगुती वातावरणात, सहजपणं, मुख्यतः मूल्यशिक्षण (संस्कार) करणारं आणि महत्त्वाचं म्हणजे मानसिक स्थैर्य पुरवणारंच, हवं.
(४) त्याआधी तसा प्रयत्न करणं कसं घातक असू शकतं, हे मूर किती काव्यमय वर्णन करून सांगतात! उचित वेळेपूर्वी बालकांना शिक्षणाकरता उद्युक्त करणं म्हणजे, मुळात निर्दोष, पण अपूर्ण अशी गुलाबाची सुंदर कळी बळानं उमलवावी, तसं असतं. कितीही नाजुक हातानं कळी उमलवली तरी मिळणारं फूल निर्दोष असण्याचा संभव कमीच.
(५) बोल्बींचं मतही त्यांनी उद्धृत केलं आहे. आठ वर्षांपर्यंत (किंवा अधिकही काल) मुलाला आईजवळ न ठेवणं म्हणजे त्याला आईपासून तोडणंच होय.
(६) बोल्बींच्याच मते, वयाच्या आठव्या किंवा अधिकही वर्षांपर्यंत बाळाला आईच्या सहवासाची पराकोटीची आवश्यकता असते. तत्पूर्वी आईपासून दूर केलं जाण्यामुळं बाळाला धोके संभवतात. पण स्वतःला मोकळीक मिळावी, पत्ते खेळता यावेत, चार तास दुपारची सुखाची झोप मिळावी, कर्तृत्व गाजवता यावं, अशा विविध कारणांकरता कित्येक आया आपल्या बाळाची ही अत्यावश्यक नैसर्गिक गरज न भागवता त्याला, बालसंगोपन केंद्रं, खेळघरं, बालवाडया, अशा नाना तऱ्हेच्या संस्थांत डांबतातच ना? त्या संस्थांत काय चालतं, याची कोण कधी चौकशी करतं?
(७) या संस्थांबद्दल बालमानसशास्त्रज्ञ Dale Meers जे म्हणतात, त्याचा पालकांनी गंभीरपणं विचार करायला हवा. डेलबाई म्हणतात. बालसंगोपन-केंद्रात नेमलेली स्त्री ही एक सेवक असते. सेवाशर्तींमुळं तिचे पदसिद्ध असे काही अधिकारही असतात. उदा. चहाची सुटी, आजारीपणाची रजा, आठवडयाच्या, सणांच्या सुटया, किरकोळ, हक्काच्या रजा असतातच. वर आणखी, कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणं आर्थिक लाभ किंवा समाधान मिळत नसेल तर काम सोडून जाण्याचाही अधिकार असतोच.
हे लाभ खऱ्या आईला असू शकतात तरी का? आहेत, असं, तूर्त, गृहीत धरू. तर मग, “आज माझी सुटी आहे, मी बाळाकडे पाहणार नाही, त्यानं शी केली तरी मी त्याचे कपडे बदलणार नाही, त्याला भूक लागली तरी दूध पाजणार नाही,” असं कोणती तरी आई म्हणेल का? आणि आईइतक्या प्रेमानं किती शिक्षिका मुलांशी वागतील?
पाळणाघरातील चार वर्षांच्या एका मुलीनं जेवायचं नाकारलं म्हणून इस्त्रीचे चटके दिल्याचं तुम्ही वाचलंच असेल. (लो.स., ४-१०-२००९). पूर्वप्राथमिक, खेळघर, बालसंगोपन-केंद्र, अशी गोंडस नावं या शाळांना दिली जातात!
२१-१२-२००२ च्या सकाळमधील बातमी अंगावर शहारे आणणारी आहे. पूर्वप्राथमिकमधलं बालक म्हणजे तीनचार वर्षांचंच. दारात बोट अडकून तुटलं. तातडीनं उपचार मिळाले. त्यामुळं बोट वाचलं, इतकंच.
(८) शाळेत लवकर घातलेल्या (डांबलेल्या?) आणि उशिरा घातलेल्या मुलांचा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा, उशिरा घातलेली मुलं, अभ्यासातील प्रगती, सवंगडयांशी जुळवून घेण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, सामाजिक भावनेचा विकास अशा कितीतरी बाबतीत, लवकर घातलेल्या मुलांच्याहून प्रकर्षानं उजवी असतात, असं आढळलं. की, उशिरापर्यंत घरी राहणारी बालकंच इतरांहून चांगली प्रगती करतात, असं किमान २० संशोधन-प्रबंधांवरून आमच्या लक्षात आलं! (मूर)
(९) मुलांना ८ वर्षापर्यंत मूलभूत कौशल्यं आली पाहिजेत, हे आम्हाला सुतराम पटत नाही. आकलनाच्या ज्या विषयांत सातत्यानं तार्किक विचार करावा लागतो (गणित, भाषेमधील व्याकरण, विज्ञान इ.), त्यांत मुलांना ८ वर्षांपर्यंत गुंतवणं अनिष्ट आहे, हा शास्त्रीय संशोधनाचा निष्कर्ष. त्यामुळं ८ वर्षांपर्यंतच्या बालकाला तसल्या कामांत अडकवण्याच्या कोणत्याही योजनेला आम्ही मान्यता देऊ शकत नाही. (मूर)
(१०) पुरेशी बौद्धिक प्रगती नसलेल्या म्हणजे वाचनसिद्धता नसलेल्या बालकाला मारून मुटकून वाचायला शिकवलं तर त्याची वाचायची इच्छाच मावळते, असंही आढळलं आहे. आणि उलट, वाचनात आधी जी काय बरी प्रगती होती, तीही सहा महिन्यांतच मावळली. नंतरच्या इयत्तांत वाचनात त्याला अडचणीच आल्या. काहींच्या बाबतीत तर सदाचीच नाहीशी झाल्याचं सहा वर्षांच्या मुलांवर केलेल्या प्रयोगांतून आढळलं!
Hyper-activity (अति चळवळ्या), Learning Disability (अध्ययन-अक्षमता), ADD (Attention Deficit Disorder, चित्ताचा अस्थिरपणा) असल्या शब्दबंबाळ संज्ञा योजून काही शिक्षक, काही इंग्रजी शाळांचे संस्थाप्रमुख, आपण मोठे शिक्षणतज्ज्ञ असल्याचा आव आणतात. हे संशोधन त्यांच्या वाचण्यात आलं आहे की नाही, माहीत नाही.
(क्रमशः भाग 2)