‘त्याचा’ मुलांना काय लाभ..?..लेखक..प्रा. मनोहर रा. राईलकर
मैत्री २०१२
शिक्षणाला लवकर आरंभ केल्याने आपल्या मुलांना काय लाभ होतो ?
भाग १
प्रा. मनोहर रा. राईलकर
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ..पुणे
पुरेश्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक सिद्धतेअभावी बळानं बालकाला काही शिकवण्याचे परिणाम लाभदायक तर ठरतच नाहीत. उलट, ते घातक ठरतात. तज्ज्ञ मंडळी हे आपल्याला सातत्यानं सांगत आहेत. पण, उराशी धरलेल्या घट्ट कल्पना आपण पालक सोडायला तयार नसल्यामुळं बालकांचा किती व कसा छळ होतो, ते पालकांना कळत नाही. पालकांच्या स्वनिर्मित, निराधार, वेडगळ कल्पना आणि तज्ज्ञांचे संशोधनाधारित निष्कर्ष या दोहोंत पराकोटीचं अंतर आहे. पालकांच्या कल्पनांचा तज्ज्ञांनी पार धुव्वा उडवला आहे. विशेषतः, पालकांना ज्यांनी उचित सल्ला द्यायचा ते शाळा चालवणारे कित्येक शिक्षणतज्ज्ञ (?) तितकेच अडाणी असावेत, ही अतिशय धोक्याची, दुःखाची म्हणून दुर्दैवाची बाब होय.
गाडी लवकर निघाली की लवकर पोचते, तसंच मुलांचं शिक्षण लवकर सुरू केल्यामुळं तीही लवकर प्रगती करतील, असं शिक्षित पालकांना, शाळाचालकांना आणि एकूणच संबंधितांना वाटत असावं. पण, या विषयात संशोधन करणाऱ्यांना तसं मुळीच वाटत नाही. उलटच वाटतं. कसं?
Elizabeth Hartley Brewer (ब्र्यूअर) यांच्या अलीकडेच म्हणजे १९-४-२००८ ला, प्रसिद्ध झालेल्या Does early schooling harm our children? (शिक्षणाला लवकर आरंभ करण्यान आपल्या मुलांना धोका असतो का?) हा निबंध, मराठी अनुवाद करून, पालकांच्या आणि संस्थाचालकांच्या विचाराकरता मांडू इच्छितो. वाचनात आलेल्या इतर प्रबंध व पुस्तकांचंही साह्य मी प्रस्तुत निबंधाकरता घेतलं आहेच. (संदर्भ लेखाच्या शेवटी.)
अनुभव: स.प. महाविद्यालयात गणित विभागप्रमुख असताना संस्थेतर्फे बालवाडी व प्राथमिक शाळा-प्रमुख म्हणून सुमारे ११ वर्षं काम केलं. बालभारतीच्या गणित समितीवर व मा.शा.प. मंडळाच्या गणित अभ्यास मंडऴावरही अकराबारा वर्षं काम केलं. महाविद्यालयात कनिष्ठ आणि वरिष्ठ वर्गांना गणित शिकवलं. हौसेनं प्रशाळेतही शिकवलं. आणि एकवीस वर्षं एमेस्सीलाही गणित शिकवलं. केजी ते पीजीच्या मुलांशी असा प्रत्यक्ष संपर्क असणारा महाराष्ट्रात आणखी कुणी नसेल, असं वाटतं.
शाळेच्या काळात पालकांकरता मी माहितीपत्रकं काढली. वर्तमानपत्रात लेख लिहिले. पालकसभेत बोललो, काहींशी समक्ष बोललो. पण, हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या पालकांनाही मी पटवू शकलो नाही, हे माझं दुर्दैव. आणि प्रवेशाचं वय या मुद्द्याकडे संबंधित सर्वांचंच दुर्लक्ष आहे, हे बालकांचं दुर्दैव. तरी प्रयत्न सोडायचा नाही, म्हणून हा निबंध.
संशोधन: शिक्षणाला लवकर आरंभ केल्यामुळं लाभ न होता बालकांचं नुकसानच होतं, हे सर्व संशोधकांचं मत आहे. लवकर शाळा सुरू केल्यामुळं बालकांचं नुकसान होतं, असंच सर्व लेख, प्रबंध वा पुस्तकं, सांगतात. म्हणून त्यांचाही परामर्श घेणार आहे. कित्येक नामवंत शिक्षणशास्त्र-संशोधकांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनाही पाहू. आणि प्रौढांच्या लहरीकरता बालकांची पिळवणूक (warping the children to satisfy adult demands), असं रास्त वर्णन हेलन हेफरनन करतात. तेही पाहू.
भारतीय संशोधन:अगदी पाश्चात्त्यांइतकं रीतसर संशोधन आहे की नाही, ते माहीत नाही. पण, आपल्याकडील काही महिलांनी ह्या क्षेत्रात लक्षणीय काम केलं आहे. त्यांना या प्रश्नांची बरीच जाणीव तरी झाली आहे. Indian Express च्या २३-१२-१९९२च्या अंकामधील उषा राय यांच्या Pre-school education: A nightmare यातली, पालकांच्या क्रौर्याची उदाहरणं वाचताना माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. वृत्तपत्रांतले, पद्मजा जोग आणि प्रभावती आपटे, डॉ. मेधा कुमठेकर-अनुपमा देसाई, श्रीमती भागवत, यांचे लेखसुद्धा, पालकांच्या, शाळाचालकांच्या, शिक्षण-संचालकांच्या, शिक्षण-मंत्र्यांच्या डोळयांत अंजन पडावं, इतके महत्त्वाचे आहेत. पण डोळे उघडले तरच ना अंजन डोळयांत जाईल?
शिक्षणाबद्दल, शाळेत लवकर घालण्याबद्दल, पालकांच्या आणि आपल्या सर्वांच्याच कल्पना इतक्या घट्ट असतात, की, वय कमी असूनही मुलामुलींना प्रवेश मिळवायचाच, यासाठी खोटं वय दाखवायलाही पालक कचरत नाहीत, याचं नवल वाटतं. खरं तर हे बालकांच्या अधिकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असूनही त्याचा विचार त्या अधिनियमांतही असल्याचं मला दिसलं नाही!
आता ब्र्यूअर बाईंचं ऐकूया का? त्या म्हणतात,
The Professional association of teachers म्हणतं, “औपचारिक शिक्षणारंभ उशीरा करून मुलांना अधिकाधिक वेळ खेळण्यासाठी मिळायलाच हवा.”
असलं बोलायला त्यांना वेड लागलं आहे का? की त्यांच्या म्हणण्याला वस्तुस्थितीचा काही आधार आहे? की पाच वर्षांच्या अपरिपक्व बालकांच्या मनावर अनाठायी अपेक्षांचे ओझं लादलं जातं, असाच त्यांचा अनुभव आहे?
शाळाशाळांत जाऊन, पालकांना, शिक्षकांना, बालमानस-शास्त्रज्ञांना भेटून, या विषयावर त्यांच्याशी मी सतत चर्चा करीत असते. शिक्षणाला उशीरा सुरुवात करावी, हा माझा नवीन विचार आहे असं मुळीच नव्हे. कित्येक देशांनी तो पूर्वीच कार्यवाहीत आणला असून, त्यामुळं मुलांचं नुकसान झालं असा तर त्यांचा अनुभव नाहीच. उलट, पाचव्या वर्षी किंवा त्यापूर्वीच शिक्षण सुरू केलेल्या शिक्षणामुळं बालकांची प्रगती टिकाऊ होत नसते, आणि प्रौढ वयात त्यांना शैक्षणिक स्वरूपाच्या अडचणीही येत राहतात, असाच सगळ्या संशोधनांचा निष्कर्ष आहे.
फ्रान्स, जर्मनी आदी, १९ देशांत शिक्षणारंभ सहाव्या वर्षी होतो. तर, स्वीडन, पोलंड अशा ८ देशांत सातव्या वर्षी. अमेरिकेतील हुदरफोर्ड येथील खासदार आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री बॅरी शीरमान यांनीही असाच बदल घडवण्याचा आग्रह सरकारकडे धरला आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या प्राथमिक शिक्षणाच्या पुनरवलोकन समितीनंही शिक्षणारंभाच्या वयाबद्दल हाच विचार मांडला आहे.
हा विचार एक लहर नसून बालकांच्या विकासाबद्दलच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच पुढं आला आहे. सातआठ वर्षांच्या बालकांत काही लक्षणीय बदल होत असतात. बालवाडीतून प्राथमिक शाळेत जाणाऱ्या बालकांत घडणाऱ्या बदलांच्या निरीक्षणांतूनच या विचारानं मूळ धरलं आहे. त्या वयापासून बालकांच्या विचारप्रक्रियेत बदल होतात, ती स्वतःविषयी वेगळा विचार करू लागतात. तेव्हापासून त्यांच्यात स्वत्वाची जाण येते, आपल्या चुकांबद्दल कुणी विधायक सूचना केल्या तर त्यांचा स्वीकार करण्याची पात्रताही येऊ लागते.
लहान मुलांची विचारप्रक्रिया मोठयांपेक्षा कमालीची वेगळी असते. खेळ, आसपासचं वातावरण, जवळच्या नातेवाईकांकडून लाभणारी माया, नंतर सहवासात येणारी इतर बालकं, यांच्या माध्यमातून ती शिकत असतात. त्यातून त्यांची स्व-बद्दलची जाणीव, आसपासच्या वातावरणाबद्दल कुतूहल, स्वतःचे गुणावगुण, स्वतःमधील सामर्थ्य, त्रुटी यांची जाणीव, वगैरे गुण विकसित होतात. स्व-चे ज्ञान आणि आत्मविकास या महत्त्वाच्या क्षमता खेळांच्या माध्यमातून विकसतात.
पण, शाळेचे वातावरण कडक शिस्तीचे असते. अपेक्षा कठोर असतात. तशा वागण्याच्या चाकोरीबद्ध मानिसकतेकरता, बाहेरच्या गोंगाट-गलक्याला तोंड देण्याकरता ती तोपर्यंत सिद्ध नसतात. ती क्षमता त्यांच्यांत सात वर्षांपर्यंतही येत नाही.
धोका: बालकांना अकाली सहन कराव्या लागलेल्या शालेय वातावरणामुळं, बालकांच्यात तोवर निर्माण झालेले आत्मविकास, स्व-बद्दलची जाणीव इत्यादी क्षमतांना, मुळापासूनच हादरा बसतो. त्यातही, विकसनाच्या, नैसर्गिक शक्तीच्या आणि स्वाभाविक प्रवृत्तीच्या पातळीवर मुलगे, मुलींच्या सहा आठवडे मागं असतात. त्यामुळं, मुलींच्या तुलनेत, मुलगे शालेय वातावरणाशी लहान वयात जुळवून घेऊ शकत नाहीत. भाषिक, शारीरिक विकास आणि व्यवधान या गुणांत मुलगे, समवयस्क मुलींपेक्षा निसर्गतःच मागं असल्यामुळं तुलनेनं, शाळेच्या औपचारिक शिक्षणाशी, कडक शिस्तीच्या वातावरणाशी जुळवून घेणं, मुलींप्रमाणे मुलांना सोपं जात नाही. म्हणून मुलांचं शिक्षण सातव्या वर्षी सुरू केलं आणि तेराव्या वर्षी त्यांना माध्यमिक शिक्षणापर्यंत नेलं तर त्यांची प्रगती इष्ट पातळीवर पोचेल. शाळेबद्दल त्यांना एरवी वाटणारा संभाव्य तिटकाराही टळू शकेल.
ज्या देशांत शिक्षणारंभ उशीरा केला जातो, तेथील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता चांगली असल्याचाच अनुभव आहे. आपल्या मुलाची प्रगती चांगली व्हावी, असं कुणाही पालकाला वाटणं स्वाभाविक आहे. म्हणूनच मुलं जितक्या लवकर शाळेत जातील तेवढे चांगलं, असं त्यांना वाटणंही हेही एका अर्थी तर्कसंगत आहे. माझीच एक जुनी कथा ऐका……
तुम्ही मूर्ख आहात: माझा मुलगा लहान होता. त्याचे बोबडे बोल ऐकायला मजा यायची. तो वाचायलाही लागला होता. म्हणून एका शाळेत त्याला घालायचं ठरवलं. पण, तिथल्या शिक्षिकेनं म्हटलं, “तुम्हाला कळत नाही.” (खरं तर तिचे शब्द होते, “तुम्ही मूर्ख आहात”.) तिचं बरोबर होतं, हे मला आज कळतंय. खरोखरीच मी मूर्ख होते. त्याला बऱ्याच गोष्टी येत असत. त्यामुळं तो वर्गात इतरांच्या पुढं राहील, अशी माझी खात्रीच होती. लवकर औपचारिक शिक्षण सुरू करण्याचे सुपरिणाम तर राहोतच, दुष्परिणामच होतात, हे आता मला कळतं आहे! (आपल्या पालकांना कधी कळेल?)
मुलांना नैसर्गिक वातावरणात, अगदी अंथरुणात लोळत, खेळत, बागडत, आपलं कुतूहल नाना प्रकारांनी शमवीत, मायेच्या उबदार वातावरणात, वाढू द्यायला हवं, याबद्दल माझी आता पुरेपूर खात्री पटली आहे. शक्य तोवर आईवडिलांच्याच सहवासात वाढू द्यायला हवं. पालकांच्या अवास्तव अपेक्षा, परीक्षा, अपेक्षाभंगातून मग शिक्षा, या तीन क्षांच्याखाली चेचण्यापासून त्यांना वाचवायला हवं. प्रेमाच्या, मायेच्या घरगुती वातावरणातच वाढवायला हवं.
ब्र्यूअरबाईंचं म्हणणं संपलं. पण, आपल्या सरकारनंही तशी दखल घ्यायला हवी. त्वरित! त्याकरता,….
आपलं बाळ इतर बाळांच्या पुढं राहावं, असं सर्वच पालकांना वाटतं, यामागचं गणित मला अजून उलगडलं नाही! म्हणून एक वैयक्तिक अनुभव. माझं मत पटलेला माझा एक विद्यार्थी. मुलाला सहा पूर्ण होईतो बालवाडीतून पहिलीत घालायची त्याची इच्छा नव्हती. आणि मुख्याध्यापिकाबाई ऐकत नव्हत्या. त्यानं माझं मत सांगितल्यावर (सुदैवानं) बाईंनी मानलं. नंतर मुलगा वर्गात पुढं असायचा. तेव्हा, इतर पालकांचं म्हणणं: “मग, तो काय मोठाच आहे.” तेच तर मी म्हणतो आहे ना?
आपल्या मुलानं इतरांच्या चार पावलं पुढं राहायला हवं, म्हणून लडखडतच चालणाऱ्या आपल्या दोनतीन वर्षांच्या मुलांना पालक औपचारिक शिक्षणाकरता इतकं धावडवतात की त्यांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होत आहेत, असं उषा राय सोदाहरण सांगतात….
(क्रमशः)