पक्ष, पलट्या अन् पवार..!
पक्ष, पलट्या अन् पवार !
——————————–
स्वत:चा पक्ष फोडणं, दुसऱ्यांचा फोडणं, स्वत: पक्षांतर करणं, दुसऱ्यांकडून करवून घेणं, विरोधकांशी हातमिळवणी करणं विरोधीपक्षीय सत्ताधाऱ्यांना ठरवून जेरीस आणणं वगैरे राजकारणातील नकारात्मक उपद्व्याप करण्यात सर्वाधिक माहिर मराठी नेता शरच्चंद्र पवार यांच्यावर पुतण्यानं काय पाळी आणली पाहा. एवढ्यात काकांची भाषणं म्हणजे नुसता तळतळाट असतो. पक्ष सोडून दादावासी झालेल्या नेत्यांची ते अक्षरश: हजेरी घेताना दिसतात. एरवी शांतपणे बोलणारे पवार ते हेच का, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो.
पुणे शहरातील वडगावशेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर ते जाम चिडले आहेत. त्यांच्या मतदारसंघातील एका महानिर्धार मेळाव्यात त्यांनी टिंगरेंना सरळ “दिवटा आमदार” म्हटलं ! पोर्श कार अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी हा दिवटा त्यावेळी पोलिसांवर आरोपींच्या बाजूनं दबाव आणत होता. त्याला “दमदार आमदार” (असे फलक टिंगरे समर्थकांनी मतदारसंघात लावलेले आहेत) म्हणायची लाज वाटली पाहिजे, असं पवार म्हणाले.
तटस्थपणे पाहिलं तर पवारांचं म्हणणं अगदीच नाकारण्यासारखं नाही. परंतु, मुळात हा माणूस तुमच्याच पक्षाचा ना ? त्याला तिकीट कोणी दिलं ? निवडून कोणी आणलं ? तुमच्या राष्ट्रवादीत आमदार होता म्हणूनच तो दादाकडे जाऊ शकला ना ! आता तुम्ही म्हणता- “शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नावानं मतं मागितली म्हणून निवडून आला. आता सोडून गेला. लोक त्याचा काय तो बंदोबस्त करतील.” याचा अर्थ, तुम्हाला सोडून गेला नसता तर तो तुमचाच असता. त्या स्थितीत पोर्श कार प्रकरणात तसाच वागला असता, तर तुम्ही चालवून घेतलंच असतं. (नवाब मलिकांचं मंत्रिपद जेलमधून चालवून घेतलंच ना !) म्हणजे, सुनील टिंगरेंचं “कसंही वागणं” फार महत्त्वाचं नाहीच. त्यांचं “दुसऱ्यांसोबत असणं’ झोंबणारं आहे. म्हणून आता त्यांना दिवटा ठरवलं गेलं आहे.
पवारसाहेब, 1978 चा काळ आठवा जरा. बेरोजगार युवकांच्या मदतीनं विधानसभा निवडणूक पार पाडून पुन्हा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यांनी तुमचं काय घोडं मारलं होतं की तुम्ही त्यांच्या, संघटन काँग्रेसच्या पाठीत खंजिर खुपसला आणि जनसंघासारख्या ‘जातीयवादी’ पक्षाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं. 1987 मध्ये राजीव गांधींच्या निमंत्रणावरून तुम्ही इंकाॅं गटात गेला आणि पुन्हा मुख्यमंत्री झाला. ही फोडाफोडी, जोडाजोडी, पक्षांतर ही सारी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आणि नैतिक राजकारणाचीच उदाहरणं म्हणायची की नाही !
1999 मध्ये सोनिया गांधींच्या परदेशी मूळाचा मुद्दा काढून तुम्ही काँग्रेस फोडली आणि तारिक अन्वर, पी. ए. संगमा (या तिघांना तेव्हा “अमर, अकबर, ॲंथनी” म्हणायचे !) यांना हाताशी धरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काढला. पण, सहा महिन्यातच अवसान गळालं ! महाराष्ट्रात त्याच काँग्रेससोबत आघाडी सरकार अन् पुढे नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात 12 वर्षे मंत्रिपद अन् आतापर्यंत त्याच मूळ काँग्रेससोबत, पण वेगळं राहून सत्तेसाठी प्रयत्नशील ! यात कुठे तत्त्व, मूळ पक्ष, साधनशुचिता वगैरेंचं काही स्थान दिसतं का हो ?
गेल्या अर्धशतकातील तुमचे पक्षच मोजू या आपण. सर्वात पहिले काँग्रेस, मग संघटना काँग्रेस, नंतर समाजवादी काँग्रेस, पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेस… आदमी एक और पार्टीयां पांच ! तुम्ही केलेल्या आघाड्यांचंही तसंच. इंदिरा काँग्रेससोबत सरकारमध्ये, विरोधी पक्षांसोबत पुलोद सरकार, मध्येच 2014 मध्ये विरोधी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी, आता शिवसेनेसारख्या कट्टर विरोधकाला फितवून त्यांच्यासोबत मविआ… राजकारणात एका नेत्याच्या किती या उलाढाली अन् कोलांटउड्या ! असेच प्रकार दुसऱ्यानं (त्यातही पुतण्यानं !) केले तर ते मात्र विश्वासघातकी. त्यांच्या नावानं बोटं मोडायची, बोंबा ठोकायच्या. हा अन्याव का ? या सर्व ‘अभ्यासक्रमां’चे प्रात्यक्षिक स्वत: सादर करणारे परमाचार्य तर तुम्हीच आहात ! मग, तुमच्याच पावलांवर पाऊल टाकणाऱ्यांचं चुकलं कुठं, हे तर सांगा !!
.
विनोद देशमुख