प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


 

 

*कर्ममार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे.*

परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे. खरोखर, भगवंताला ‘सर्व’ देण्यापेक्षा ‘स्व’ द्यायला शिका. ‘स्व’ दिल्यावर ‘सर्व’ न दिले तरी चालेल, कारण ते आपले – आपल्या मालकीचे राहातच नाही. उलट ‘सर्व’ देऊन ‘स्व’ द्यायचा राहिला, तर ‘सर्व’ दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला ‘स्व’ देणे म्हणजे ‘मी त्याचा आहे’ ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय.

वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते. परंतु ज्या भगवंताची प्राप्ति व्हावी म्हणून करावयाची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मात नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते. शिवाय, सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्याकारणाने, वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत. म्हणून, आपण कर्ममार्गाने जात असता, कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग मनापासून करणार्‍या माणसामध्ये, नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते, त्याबद्दल माझा आक्षेप आहे. ए‍र्‍हवी, कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल आदरच आहे.

Advertisement

एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही. परंतु, कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकेच नव्हे, तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते, आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते. रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे, तर तो सिद्धमंत्र आहे. तो भगवंतापर्यंत नेतो; नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नि आहे. रामनाम हा ॐकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्रीशंकरांपासून तो श्रीसमर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा साडेतीन कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. नाम घेत असता, जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे, असा भरवसा ठेवावा.

*३४६. नामाकरिता नाम घ्या, की त्यात राम आहे हे नक्की कळेल.*

🌸🌼🌺🍀🍁🌷🍁🍀🌺🌼🌸


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!