जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन


 

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या

-जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि. 25- मतदार यादी ही निवडणुक प्रक्रीयेचा पाया आहे. सातारा‍ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा आणि मतदार नोंदणी अधिकारी २६२ सातारा विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी २६२ सातारा विधानसभा मतदारसंघ नागेश गायकवाड, पाटणचे तहसीलदार आनंद गुरव, निवडणूक नायब तहसीलदार अनिल जाधव, छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

Advertisement

मतदान हे दान नसून कर्तव्य आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, आपली लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आपले मत निवडणूकांमध्ये नोंदवले पाहिजे. मतदार यादी ही लोकसभा व विधानसभा निवडणुका पुरतीच मर्यादीत नसून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींसाठीही मतदार यादीचा वापर केला जातो. त्यामुळे ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नसतील तसेच या वर्षामध्ये जे नवमतदार होणार आहेत अशा सर्व मतदारांनी आपल्या नावाची नोंद मतदार यादीमध्ये केली पाहीजे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेचे महत्व विषद केले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संदेश दाखवण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नव मतदारांना निवडणूक ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच झालेल्या निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या कामात व जनजागृतीच्या कामात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदार दिवसाचे महत्त्व सादरीकरण केले.
प्रास्ताविक भगवान कांबळे यांनी केले. तर आभार तहसीलदार नागेश गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व नव मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!